ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे निधन

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात रवींद्र आणि नरेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एस. टी. महामंडळात नोकरी करत पां. के दातार यांनी आपली साहित्यविषयक आवड जोपासली. या आवडीमुळेच ठाण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दातार आणि ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय असे समीकरण ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात रूढ झाले होते. ते मूळ पनवलेच रहिवासी होते. 1950 साली ते ठाण्यात वास्तव्यास आले, तेव्हापासून ठाणे हीच त्यांची कर्मभूमी झाली. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे त्यांनी तीन वेळा अध्यक्षपद भूषविले.याशिवाय संग्रहालयाच्या कार्यवाह पदाची धुराही त्यांनी सांभाळली. 2010 मध्ये ठाण्यात झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन आणि नियोजन त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण रित्या केले. या साहित्य संमेलनासाठी भरीव निधीचे संकलन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या संमेलनातून शिल्लक राहिलेला निधी मराठी ग्रंथसंग्रहालयाला अनेक नावीन्यपुर्ण योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरला. केवळ मराठी ग्रंथसंग्रहालयच नाही तर ठाणे नगर वाचन मंदिर या ठाण्यातील दुसर्या जुन्या असलेल्या ग्रंथालयातही त्यांनी पदे भूषविली. ठाणे जनता सहकारी बँकेचे ते 5 वर्ष संचालकही होते. ब्राम्हण सभा, समर्थ सहकारी भांडार, सहकार भारती, संस्कार भारती या संस्थांच्या कार्यातही ते कायम सक्रीय होते. ठाण्यात चित्तपावन ब्राम्हण संघाच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यातही त्यांचे योगदान होते.
मनमिळाऊ आणि मितभाषी स्वभावामुळे ठाण्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक वर्तुळात त्यांच्याबद्दल कायम आदराची भावना होती. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथसंपदेचे नुकसान होवू नये, यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मराठी साहित्य संमेलनांना ते नियमित हजेरी लावत. त्यांच्या संग्रही अनेक मराठी पुस्तके होती. या पुस्तकांचे वाटप त्यांनी ठाणे जिल्ह्यातील वाचनालयांना केले. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.

Leave a Comment

%d bloggers like this: