आपलं आरोग्य उत्तम राखणं हे आपल्या हाती आहे. त्याची सुरूवात घरातील आणि घराबाहेरील परिसराची नियमितपणे स्वच्छता करून करायला हवी. स्वच्छ वातावरणात जंतू संसर्गाचं प्रमाण कमी होतं आणि मनही प्रसन्न राहतं. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ तेलकट, तिखट, पाणीपुरीसारखे पदार्थ हे आजाराला निमंत्रण देणारे असून ते टाळले तर ५० टक्के आजार कमी होतील. चांगल्या सवयी आणि चांगले विचार या दोन्ही गोष्टी शरीर आणि मनाचे असे दोन्ही आरोग्य सांभाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मनाचे आरोग्य हे अतिशय महत्वाचे आहे असं पर्यावरण दक्षता मंचाचे संस्थापक डॉ. विकास हजरनिस यांनी सांगितलं. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेत ते बोलत होते. कुठलंही व्यसन हे आरोग्यास घातकच. तंबाखू, सिगरेट, दारू सारख्या व्यसनांमुळे होणारे कॅन्सरसारखे भयानक आजार हा खूप पुढचा टप्पा आहे. त्याआधी त्याचा छोट्या मोठ्या प्रमाणात शरीराला त्रास होत असतो. शरीरातील अवयव त्याबद्दल आपल्याला सांगत असतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळं मग त्याचं गंभीर आजारात रूपांतर होतं. त्यामुळं आपल्या शरीराशी संवाद साधणं, त्याचं ऐकणं ही सशक्त आरोग्याची गुरूकिल्ली आहे. त्यासाठी मन शांत ठेवणं, संयम पाळणं आणि सकारात्मक विचार करणं जरूरीचं आहे. मन कमकुवत झालं तर शरीर कमकुवत व्हायला वेळ लागत नाही असं विकास हजरनिस यांनी सांगितलं.
