गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब

ठाण्यामध्ये समूह विकास योजना वादग्रस्त ठरली असताना गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब उमटलं आहे. ठाण्यातील राबोडी, कोळीवाडा गावठाण संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वैती आणि महेश वैती यांनी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षातील घरगुती गणेशोत्सवात समूह विकास योजनेला विरोध दर्शवणारी सजावट केली आहे. ठाण्यातील समूह विकास योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे वगळून मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली होती. तरीही ठाण्यातील कोळीवाड्यांमधील रहिवाशांना समूह विकास योजनेबाबत जनसुनावणीचा फेरा कायम ठेवण्यात आला. शहराच्या नियोजन आराखड्यामध्ये चेंदणी कोळीवाडा उल्लेख नाही. कोळीवाड्यांचं सीमांकन करून गावठाणांना समूह विकास योजनेमधून वगळावं अशी मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. म्हणून दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकाकडून समूह विकास योजनेच्या विरोधात हाक देण्यात आली होती. त्याचबरोबर गणेशोत्सवातही समूह विकास योजनेच्या विरोधात सजावट साकारण्यात आली आहे. अवघ्या अडीच ते तीन हजारात केलेल्या गणपतीच्या पर्यावरणस्नेही सजावटीत पुठ्ठा आणि बांबूचा वापर करून कोळी-आगरी समाजाच्या उदरनिर्वाहाचं साधन होडी आणि वल्हवणारा नाखवा दाखवण्यात आलं आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये समूह विकास योजनेच्या विरोधातील घोषणांचे फलक लावण्यात आले आहेत. क्लस्टर विरोध गावासाठी-आपल्या गावाच्या गावपणासाठी, क्लस्टर ठाण्याला लागलेले नष्टर, कोळीवाडे-गावठाण कायमस्वरूपी क्लस्टर मुक्त करा असे फलक या सजावटीत लक्ष वेधून घेणारे आहेत. १० दिवसानंतर जसे गणपती आपल्या गावी जातील तसेच क्लस्टर योजना रेटून नेणा-या नेत्यांनाही या प्रतिकात्मक होडीतून गावी पाठवण्याचा इशारा देखाव्याद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading