ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोलाचा हिस्सा असणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी बस स्थानकातील मलमुत्राच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण झाले आहेत. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण सुरु असताना गेले चार दिवस कोपरी बस स्थानकातील स्वच्छतागृहाची मलनि:स्सारण वाहिनी फुटली आहे. हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट स्थानक परिसरात वाहत असल्याने प्रवाश्यांना रांगेत उभे राहणे कठीण झाले आहे. मलमुत्राच्या घाणीने परिसरातील नागरिकांनाही त्रास उद्भवत असल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी टीएमटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि तात्पुरती साफसफाई करून प्रवाश्यांना दिलासा दिला आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात 1996 साली ठाणे महापालिकेने रेल्वेच्या जागेत तात्पुरते बसस्थानक उभारले. मात्र टीएमटीने आपला मुक्काम कायमचा इथेच ठोकला. त्यानंतर मध्यंतरी या बस स्थानकाची डागडुजी करण्यात आली. 2012 साली वातानुकुलीत व्हॉल्वो बसेसद्वारे बोरीवली मार्गावर सेवा सुरु केली. त्याचबरोबर मिरारोड, नालासोपारा या नफ्याच्या मार्गासह वागळे आगारसाठी बसेसचे संचलन इथूनच होते. त्यामुळे टीएमटीच्या तिजोरीत प्रतिदिन सात ते आठ लाखांची भर पडते. तरीही परिवहनच्या उत्पन्नात मोलाची भर टाकणाऱ्या या स्थानकाची आजघडीला दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी परिवहन प्रशासनाने स्थानकातील थांब्यांची डागडुजी आणि रंगरंगोटी करून स्थानक चकाचक केले. तसेच थांब्यावर पारदर्शक पत्रे टाकले आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून नियंत्रण कक्षातील स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहून नेणारी मलवाहिनी तुंबून ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे मलमूत्र बस थांब्यावर साचून डबके बनले असल्याने बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाश्यांनी नाक मुठीत धरले आहे. याबाबत स्थानक अधिकारी किरण भागवत यांना स्थानिकांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी वागळे आगारातील नीलकंठ पाटील यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोपरी प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक चारू घुटे यांनी तर फोनही उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत. अखेर परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्या कानावर ही बाब जाताच तातडीने सूत्रे हलली आणि स्थानक स्वच्छतेसाठी कुमक मागवून सफाई मोहीम हाती घेण्यात आली.
