उल्हासनगरमध्ये आंबवणे कुटुंबियांच्या घरी गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव

सण उत्सव म्हणजे घरातलं चैतन्य. यानिमित्तानं एकमेकांकडे जाणं येणं होतं. भेट होते. पण ही भेट केवळ अवांतर गप्पात सिमित न राहता ती समाज बदलाचं माध्यम ठरावं या विचारानं प्रेरीत होऊन एका लहानशा कुटुंबानं गेल्या २० वर्षापासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाचा अवलंब केला आहे. आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भरत आंबवणे यांच्या घरचा गणपती उत्सव. उल्हासनगर येथे राहणारे भरत आंबवणे गेल्या २४ वर्षापासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. सध्या पर्यावरण स्नेही हा परावलीचा शब्द झाला आहे. पण भरत आंबवणे यांनी गेल्या  २० वर्षापासूनच ही संकल्पना अंगिकारली आहे. आकाराने लहान, सुबक, देखणी अशी शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती आंबवणे कुटुंबिय गेल्या २० वर्षापासून मनोभावे पूजत आहेत. इतकंच नाही तर आपल्या बाप्पाचं विसर्जनही ते घरच्या घरीच करतात. यासाठी एक मोठी पाण्याची टाकी त्यांनी आणली असून त्यात भक्तीभावानं गणपती बाप्पाचं विसर्जन ते करतात. विसर्जनानंतरचं पाणी ते घरातल्या आणि परिसरातल्या झाडांसाठी उपयोगासाठी आणतात. मूर्तीचा उरलेला गाळ पुन्हा मूर्तीकाराला देऊन त्या मातीचा पुनर्वापर करतात आणि विशेष म्हणजे सध्याच्या जगात आपल्या या पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाची त्यांनी कुठेही जाहीरात केलेली नाही. नित्याची बाब समजून ते हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. भरत आंबवणे यांच्या कुटुंबातील एका लहान कन्येने गणपतीच्या सजावटीतही हेच व्रत अंगिकारलं आहे. जुई या त्यांच्या मुलीनं कागदावर स्वत: चित्र रेखाटली आहेत आणि त्यातून स्त्री-पुरूष समानता, स्त्री भ्रूण हत्या हा संदेश दिला आहे. ३ महिने जुईनं या सजावटीसाठी मेहनत घेतली. दिव्यांच्या झगमगीत रोषणाईपेक्षा कितीतरी अधिक पटीनं बाप्पाच्या मूर्तीची शोभा जुईची मेहनत वाढवत आहे. सणाच्या निमित्तानं का होईना पण आपले विचार सर्वांपर्यंत पोहचवणं हे भरत आंबवणेंना जास्त महत्वाचं वाटतं.

Leave a Comment

%d bloggers like this: