घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार – आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटरच्या सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये होणारआहे. कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ९-९ मीटर सर्व्हिस रोडचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार आणि काही खाजगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्क्षा पार्किंगसाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक वाहन चालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात. कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बर्याचदा खाजगी वाहनासह फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि अँब्युलन्सही अडकल्या जातात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रूग्ण असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या रोडवरील वाहतुक कोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. याकरिता घोडबंदर रोडवरील जर दोन्हीं बाजूच्या ९-९ मीटरचा सर्व्हिस रोड हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक-एक मीटरचा फुटपाथ केला तर पादचारी आणि वाहनचालकांना या रस्त्याचा वापर करता येईल. हा अतिरिक्त १६ मीटर सर्व्हिस रोड घोडबंदर रोडला जोडावा तसेच घोडबंदर रोडवर काही ठिकाणी वनखात्याची कुंपण भिंत भर रस्त्यात येत असल्यामुळे बाधीत होणारी जमीन लवकरात लवकर ताब्यात घेऊन रस्ता रूंदीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत होतो. त्याला शासनाने मान्यता दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या कामाची एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून त्याकरिता ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी एम.आर.डी.ए. तर्फे जास्तीत जास्त काम करण्यात येणार आहे. या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. एका बाजूला बोरीवली टनेल होत आहे तर दुसर्या बाजूला बाळकुम ते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. तसेच घोडबंदर रस्त्याच्या रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading