कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून एकजुटीने संघटीतपणे लढा देऊ – एकनाथ शिंदे

कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ या असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी हे आवाहन केलं. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध आहे. जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे नियोजन प्रशासनाने केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव हा एकमेकांच्या संपर्कातून होत असल्याने सोशल डिस्टान्सींगला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील त्यांनी स्वत: पुढे येवून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे तरच आपण या आजाराची साखळी तोडून यातून मुक्त होवू शकतो. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची संख्या वाढवून आवश्यक असलेले डॉक्टर्स, नर्सेस,इतर कर्मचारी उपलब्ध करुन त्यांना सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन देणे आणि त्यांची निवास- भोजन व्यवस्था करण्याच्या सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या सामाजिक संस्था अन्नधान्याचे वाटप करीत आहेत त्यांना अन्नधान्य आणि भाजीपाला तसंच तांदूळ, डाळ, तेल, मसाले उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळतील या दृष्टीने सर्व खाजगी रुग्णालये सुरू राहतील अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास पालकमंत्री या नात्याने आपल्या वैयक्तीक निदर्शनास आणून द्यावी याबाबत तातडीने योग्य ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसंच ठाणेकरांनी संयम दाखवून प्रशासनास जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत कोरोनाचे सावट दूर होईपर्यत असेच सहकार्य करावे असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading