TMC

सोळंकी सदन या धोकादायक इमारतीतील दुकानं वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानं रहिवाशांमध्ये संताप

ठाणे महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीच्या यादींमधील सी-एक श्रेणीमध्ये मोडणा-या इमारती तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश दिलेले असतानाही ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सोळंकी सदन या धोकादायक इमारतीतील दुकानं वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानं रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. शिवाजी पथावरील सोळंकी सदन ही इमारत लालकुवर सोळंकी आणि इतरांच्या मालकीची असून ६० वर्ष जुनी आहे. ही इमारत अतिधोकादायक असल्याचं महापालिकेनं यापूर्वी तिनदा जाहीर केलं असून ही इमारत सी-१ श्रेणीत असल्याचं घोषित केलं आहे. गेल्या ५० वर्षात या इमारतीची फारशी देखभाल झालेली नाही. महापालिकेनं इमारत धोकादायक जाहीर केल्यानंतर इमारतीच्या दुस-या आणि तिस-या मजल्यावरील रहिवासी आपल्या जागा सोडून इतरत्र राहण्यास गेले. परंतु तळ अधिक पहिल्या मजल्यावर व्यावसायिक गाळे असल्यानं त्यांचे व्यवहार तसेच सुरू राहिले. आता या इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला पाडण्यात येणार असून व्यापारी गाळे अबाधित ठेवले जाणार आहेत. इमारत जर अतिधोकादायक झाली असेल तर ती संपूर्ण पाडून टाकावी अशी रहिवाशांची मागणी आहे. याबाबत महापालिका आयुक्त, मुख्यमंत्र्यांपर्यंत रहिवाशांनी पाठपुरावाही केला होता. पण तळमजल्यावरील दुकानदारांमध्ये राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्ती असल्यामुळं दुकानं तशीच ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत. या इमारतीत तळघर, तळमजला अधिक तीन मजले आहेत. इमारतीत दोन हॉटेल्स असून अनेक वर्ष तळघरात सांडपाणी जाऊन तळघरातील जमीन भुसभुशीत झाली आहे. त्यामुळं संपूर्ण इमारत धोकादायक झाली असून फक्त दोन मजले पाडून उपयोग काय असा रहिवाशांचा सवाल असून एखादी दुर्घटना घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील असं रहिवाशांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *