आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा

आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा काढण्यात आला. आदिवासींच्या हिताच्या आणि गेली अनेक वर्ष प्रलंबित मागण्यांसाठी काढला जाणारा हा मोर्चा प्रश्नांची तड लागेपर्यंत सुरू राहणार होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिल्यानं हा मोर्चा ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. सध्या चर्चेत असलेल्या एनआरसीच्या प्रश्नावरही श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. जातीच्या दाखल्यावर पडताळणीसाठी लादलेल्या जाचक अटी आणि पुराव्यांबाबतचे नियम करून सरकारने आदिवासींवर आधीच एनआरसी लादल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडीत यांनी यावेळी केला. कायदा आणि सुधारणेला विरोध नसून जोपर्यंत पुरावे काय आणि केवळ कागदपत्राचे पुरावे नसून वस्तुनिष्ठ पुरावे काय आणि कसे ग्राह्य धरणार याबाबत शासनानं आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असं मत विवेक पंडीत यांनी व्यक्त केलं. भटके, विमुक्त, पारधी आणि एकूणच निरक्षरतेच्या गर्तेत असलेल्या सर्वच जातीधर्माच्या लोकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. सामान्य लोकांच्या असहाय्यतेचा फायदा कोणी उचलत असेल, कायद्यामुळे जातीय तेढ आणि जनतेला त्रास होत असेल तर याविरोधातही संघटना आक्रमक राहील असं विवेक पंडीत यांनी सांगितलं. आदिवासींच्या जगण्याचा, दोनवेळच्या पोटभर जेवणाचा, शिक्षण-आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा असून त्यासाठी लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading