महापालिका आयुक्तांसह अन्य अधिका-यांच्या तात्काळ बदल्या करून गेल्या ५ वर्षातील निविदा तसंच पूर्ण आणि अपूर्ण प्रकल्पांची चौकशी करण्याची जागरूक नागरिकांची मागणी

ठाणे महापालिकेतील कारभार सुधारण्यासाठी महापालिका आयुक्तांसह अन्य अधिका-यांच्या तात्काळ बदल्या करून गेल्या ५ वर्षातील निविदा तसंच पूर्ण आणि अपूर्ण प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील काही जागरूक नागरिकांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे ५ वर्ष एकाच जागेवर टिकून राहत आहेत. त्यांची बदली न होणं याचा अर्थ त्या पदावर प्रचंड आर्थिक हितसंबंध तयार झाले आहेत. सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड यांच्या बदलीचे आदेश दोनवेळा निघूनही तेही इथेच आहेत. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा कार्यकाल ५ वर्ष तर चारूशीला पंडीत यांचा कार्यकाल ४ वर्ष झाला असतानाही हे अधिकारी अजून पालिकेत कसे याची चौकशी होण्याची गरज असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. ठाणे महापालिकेत प्रचंड गैरकारभार, भ्रष्टाचार आणि अनाचार फोफावला असल्याची नागरिकांची भावना आहे. नियम, कायदे, राज्य सरकारचे आदेश, न्यायालयाचे निकाल या सर्वांना केराची टोपली दाखवली जात असून स्थानिक आमदार आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या साक्षीनं सर्व अधिकारी आपापल्या खुर्चीच्या आणि अधिकाराच्या जोरावर बिल्डर आणि ठेकेदारांच्या साथीनं होणा-या प्रकल्पात नियमभंगांची अनेक प्रकरणं उघड होत आहेत. या सर्वांची चौकशी झाल्यास हे त्यातून स्पष्ट होईल. नुकत्याच्या स्वत:च्या अधिकारात केलेल्या बदल्या ४८ तासात रद्द करण्यात आल्या. केवळ या एका प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक बाबी स्पष्ट होतील. या पार्श्वभूमीवर तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या सर्व अधिका-यांची बदली करावी आणि गेल्या ५ वर्षातील सर्व निविदा, पूर्ण-अपूर्ण प्रकल्प, काही अधिका-यांचं उत्पन्न, ठेकेदारांसोबत भागीदारी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी चेतना दिक्षीत, उन्मेष बागवे, संजीव साने, किशोर दिवेकर, राजीव दत्ता अशा ठाणेकरांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading