तिकिट दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देताना कोणतीही दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे. ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी हा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला. ठाण्याची लोकसंख्या पाहता परिवहन सेवेकडे ७०० हून अधिक बसेसची आवश्यकता आहे. मात्र परिवहन सेवेच्या ताफ्यातील २७७ बसपैकी ११० बस रस्त्यावर धावत आहेत. या अर्थसंकल्पात नादुरूस्त असलेल्या १६० सीएनजी बसेसपैकी १३० बसेस दुरूस्त करून त्या चालवण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. महिलांसाठी ५० पैकी ३० बसेस दाखल झाल्या असून उर्वरीत २० बसेस मार्चपर्यंत दाखल होणार आहेत. तर जून पर्यंत ५० मिडी बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. परिवहन सेवेनं अर्थसंकल्पामध्ये १०० वातानुकुलित इलेक्ट्रीक बसेससाठी तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे १२५ महिला वाहकांची कंत्राटी पध्दतीनं नेमणूक केली जाणार आहे. ई-तिकिटसाठी ईटीआयएम मशिन, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत, बस थांब्यांवर जाहिराती प्रसिध्द करण्याचे हक्क देणे, परिवहनच्या जागांवर होर्डींगला परवानगी देणे, आधुनिक पध्दतीचे निवारे उभारणे, परिवहनच्या जागांवर एटीएमची उभारणी करणे, बस आगारांमध्ये सौर उर्जा प्रकल्प राबवणे, बस मध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहिरातीद्वारे उत्पन्न वाढवणे, बसेसचं सुधारीत वेळापत्रक तयार करून फे-या वाढवणं असे उत्पन्नाचे विविध मार्ग अर्थसंकल्पातून सुचवण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading