ठाण्यातील पदपथ आणि रस्ते हे नागरिकांसाठी मोकळेच असले पाहिजेत – महापौर

ठाण्यातील पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठीच आहेत ते मोकळेच असले पाहिजेत या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत. यासाठी आपल्या विरोधात फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, पुतळे जाळले तरी चालेल असं नमूद करून कायदा हा सर्वांनाच सारखा आहे त्याची अंमलबजावणी करताना डावा, उजवा असा भेदभाव न करता प्रशासनानं ठोस कारवाई करावी असं महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेत दुस-या महापौर जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महापौर बोलत होते. या जनसंवाद उपक्रमात २७ अर्ज आले होते. ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करा, नागरिकांसाठी पदपथ मोकळे करणे, शहरातील विविध ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूर फवारणी करणे अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रातील गटारे, नाले, सार्वजनिक ठिकाणच्या साफसफाईचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याबाबत केवळ तक्रारीच्याच ठिकाणी कारवाई न करता संपूर्ण महापालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी कच-याची समस्या आहे तिथे तातडीनं कार्यवाही करून आवश्यकतेनुसार धूर आणि औषध फवारणी करण्याबाबत प्रभावी कार्यवाही करावी तसंच रस्ता रूंदीकरणात वा इतर प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करताना सिध्दार्थनगर येथील बीएसयुपी योजनेतील नागरिकांना कायमस्वरूपी घरं देण्याबाबत तातडीनं कारवाई करावी असे आदेशही महापौरांनी दिले. घोडबंदर रस्त्यावरील ऋतू एन्क्लेव्ह येथील नालेसफाई, उघडी असलेली गटारं, पार्कवूड येथील सांडपाण्याचा प्रश्न, उद्यान साफसफाई, बोअरवेलचं काम करणं आणि परिसरातील रस्ते सफाई असे विविध विषय या जनसंवादात उपस्थित करण्यात आले. या समस्यांची दखल घेऊन संबंधित विभागांनी तात्काळ पाहणी करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. पदपथ आणि रस्ते हे नागरिकांना वाहतुकीसाठी असल्यानं त्यावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रभाग समिती स्तरावर सातत्यानं कार्यवाही करण्यात यावी तसंच नागरिकांनी परस्पर संबंधित विभागाकडे आपल्या कामकाजासंदर्भात सादर केलेल्या अर्जांचा योग्यवेळी निपटारा करावा जेणेकरून नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागणार नाहीत असं महापौरांनी सांगितलं. जनसंवाद उपक्रमात येणा-या तक्रारी मराठीतच असायला हव्यात अशी आग्रही भूमिका यावेळी महापौरांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading