social TMC

शहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार करण्याची भूमिपुत्रांची मागणी

शहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार केला जावा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे. शनिवारी कासारवडवली येथील राम मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांच्या या सभेस वाघबीळ, गायमुख, भाईंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, मोगरपाडा, कोळीवाडा आणि भिवंडी या परिसरातील भूमिपुत्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील आगरी-कोळी समाज खाडी किनारी मासेमारी आणि पारंपरिक डुबी पध्दतीनं वाळू उत्खनन करत असतो. गेल्या ४ वर्षापासून रेती व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. स्थानिक भूमिपुत्रांना विचारात न घेता खाडी किना-यांचं सुशोभकरण होत असल्याबद्दल भुमिपुत्रांमध्ये नाराजी आहे. भूमिपुत्रांचा विकासाला विरोध नसून विकासामध्ये भूमिपुत्रांनाही वाटेकरू करून घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. खाडी किनारी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवत असताना उपलब्ध होणा-या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, भविष्यात रेती व्यवसाय सुरू झाल्यास त्यासाठी आत्तापासूनच भूखंड राखून ठेवले पाहिजेत अशा भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिका-यांना निवेदन दिलं जाणार असून याबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. येणा-या दिवसात भूमिपुत्रांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *