crime

रिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात लावला छडा

रिक्षात विसरलेल्या सव्वा तीन लाखांच्या दागिन्यांच्या पिशवीचा पोलीसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. डोंबिवलीत राहणारे राजरत्नम नाडर हे आपल्या पत्नीसह पोखरण रोड नंबर २ येथे राहणा-या आपल्या नातेवाईकांकडे आले होते. ठाणे स्टेशनवरून सुभाषनगर येथे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. सुभाषनगर येथील महाकाली डेव्हलपर्सच्या ऑफीसजवळ ते उतरले. मात्र रिक्षातून उतरताना नाडर हे आपली पिशवी रिक्षातच विसरले. त्यांच्या पिशवीमध्ये १०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. रिक्षातून उतरल्यानंतर पिशवी विसरल्याचं नाडर यांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. नाडर यांनी त्वरीत चितळसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीसांनी नाडर जिथे रिक्षातून उतरले होते तेथील क्लोज सर्किट टीव्हीचे फूटेज तपासले. या फूटेजमध्ये रिक्षाचा क्रमांक दिसत होता पण सिरीज दिसत नव्हती. तरीही पोलीसांनी रिक्षाचा क्रमांक आणि नाडर यांनी दिलेल्या रिक्षा चालकाच्या वर्णनावरून शोध सुरू केला. नाडर ज्या रिक्षात पिशवी विसरले होते ती रिक्षा कळवा-विटावा येथील असल्याचं समोर आले. अखेर पोलीसांनी ही रिक्षा शोधून काढली. रिक्षा चालक संतोष आंबेडकर याच्याकडून सोन्याचे दागिने असलेली पिशवी हस्तगत करून नाडर यांना परत केली. दरम्यान रिक्षावालाही या पिशवीसाठी नाडर यांचा शोध घेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *