railway

देशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन

आशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्यास १६५ वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर १६५ वर्षापूर्वी म्हणजे १६ एप्रिल १८५३ ला मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली. १४ डब्यांच्या गाडीत त्यावेळी मुंबईतील ४०० मान्यवर होते. बोरीबंदर रेल्वे स्थानकात २१ तोफांच्या सलामीत या गाडीचा शुभारंभ झाला. या गाडीला बोरीबंदरवरून ठाण्याला यायला १ तास १५ मिनिटं लागली. आज १६५ वर्षानंतरही या वेळेत फारशी घट झालेली नाही. संपूर्ण आशिया खंडात मुंबई ते ठाणे मार्गावर प्रथम रेल्वे धावल्यामुळं या मार्गाचं ऐतिहासिक महत्वही मोठं आहे. हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देण्याच्या घोषणा झाल्या पण त्या फक्त वल्गनाच ठरल्या आहेत. रेल्वे सेवेला १६५ वर्ष उलटूनही रेल्वे प्रवाशांना फारशा सुविधा मात्र अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. १६५ वर्षापूर्वी गाडीतून प्रवास करणं म्हणजे एक नवल होतं मात्र १६५ वर्षानंतर रेल्वे प्रवासी इतक्या गर्दीतून करत असलेला प्रवास जगाच्या दृष्टीनं नवल ठरला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या वाढली असुन अनेक प्रवाशांना यामुळे जीव गमवावे लागले आहेत. पण रेल्वे प्रशासन माञ यावर उपाययोजना करण्यास अयशस्वीच ठरल्याचे दिसत आहे. आज खासदार राजन विचारे यांनी कोकण रेल्वे आणि इतर रेल्वे प्रवासी संघटना यांच्यासह फलाट क्रमांक २ वर केक कापून ठाणे रेल्वे स्थानकाचा १६५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *