वाहतुकीचे नियम मोडणा-या ४० हून अधिक पोलीसांवर कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणा-या ४० हून अधिक पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागानं नियम मोडणा-या वाहन चालकांवर इ-चलनाद्वारे कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर अथवा सिग्नलवर एखाद्या चालकानं नियम तोडल्यास वाहतूक पोलीस वाद न घालता तात्काळ वाहनाचा फोटो काढून इ-चलन वाहन धारकाला पाठवून देतात. वाहनाच्या क्रमांकावरून वाहन धारकाचा छडा लावून हे इ-चलन पाठवलं जातं. हा दंड वाहन चालकाला केव्हाही भरण्याची मुभा असते. आत्तापर्यंत पोलीस केवळ सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करत असल्याची ओरड होती. मात्र आता पोलीसांवरही इ-चलनाचा बडगा उगारला गेला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात कामकाजानिमित्त आलेल्या पोलीसांवर कारवाई करण्यात आली. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अशोक बाराते यांच्या पथकाद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये ४० हून अधिक पोलीस कचाट्यात सापडले. अनेक पोलीसांवर विना हेल्मेटमुळे कारवाई झाली. गेल्या काही दिवसांमध्ये विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई होत असून आता पोलीसांवरही हीच कारवाई होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading