मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

ठाण्याचा विकास हा इतर शहरांना आदर्श ठरणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल ठाण्यात बोलताना काढले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध नागरी विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीन हात नाका येथील भव्य स्मारकाचं उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झालं. नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्मारकात शिवसेना प्रमुखांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती तरूण पिढीला कायमस्वरूपी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र, त्यांचा जीवनप्रवास, वैयक्तीक आणि प्रासंगिक फोटो, गाजलेली भाषणं, पुस्तकं आणि भाषणांच्या सीडीज् आदींचा संग्रह या स्मारकात ठेवण्यात आला आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे ई-उद्घाटन आणि संकेतस्थळाचं अनावरण, कमांड अँड कंट्रोल सेंटर, खाडी किनारा विकास प्रकल्प, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, घनकच-यापासून वीज निर्मिती प्रकल्प, शहरी वनीकरण प्रकल्प, विज्ञान केंद्र अशा विविध प्रकल्पांचा ई-भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी शहराच्या विकासाचा आढावा घेणा-या पथदर्शी विकासाचे ठाणे या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना बीएसयुपी योजनेअंतर्गत सदनिका आणि रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले. अनाथ, निराधार बालकं तसंच एचआयव्ही बाधित पालकांची मुलं यांना उदरनिर्वाहासाठी प्रातिनिधीक स्वरूपात अनुदान प्रदान करण्यात आलं. ठाण्याच्या विकासात योगदान देणा-या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर नरेश म्हस्के आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना प्रातिनिधीक स्वरूपात सन्मानित करण्यात आलं. ठाण्याच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते मुख्यमंत्री म्हणून आपण नक्कीच पूर्ण करू असं सांगत चतुर्थ श्रेणी आणि पोलीसांसाठी १० टक्के सदनिका नवीन गृहनिर्माण प्रकल्पात राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांना केल्या. तर एमएमआर अंतर्गत येणा-या इमारतींचाही पुनर्विकास करण्याबाबत कार्यवाही करण्याचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading