मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलीसाचं बिंग फुटलं

ठाण्यातील बड्या मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलीसाचं बिंग फुटलं आहे. कल्पेश पाटील असं या तोतयाचं नाव असून त्यानं आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून आल्याचं सांगितलं होतं. कापुरबावडी येथील लेकसिटी मॉलमध्ये स्पार्क मॅनेजमेंटचे व्यवस्थापक दीपक मोहिते यांच्या सतर्कतेमुळं या तोतयाला पकडण्यात यश आलं. वर्तकनगर येथे राहणा-या कल्पेश पाटीलनं मॉलमध्ये येऊन आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट ५ चे अधिकारी असल्याची बतावणी केली आणि मॉलमध्ये ड्रग्ज, चरस अशा अंमली पदार्थ विक्री करणा-या व्यक्तींची गोपनीय माहिती असून त्याबाबत पडताळणी करून अहवाल सादर करायचे असल्याचं सांगितलं. त्यानुसार दीपक मोहिते यांनी कल्पेशला संपूर्ण मॉल फिरवून दाखवला. त्यानंतर कल्पेशने अहवाल सादर करायचा असल्याचं सांगून हा अहवाल तयार करण्यासाठी संगणक मागितला. तसंच आपला मुलगा रूग्णालयात असल्यानं त्याच्या उपचारासाठी साडेअकरा हजार रूपये देण्याची मागणी केली, त्यावेळी मोहिते यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी मॉलच्या मालकांना कळवून कापुरबावडी पोलीसांशी संपर्क साधला आणि या तोतयाला पोलीसांच्या हवाली केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading