महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची महापौरांची मागणी

ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावा अशी मागणी महापौरांनी एका पत्राद्वारे नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. ठाणे शहरामध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ठाणे शहरातील जुन्या इमारती या छोट्या भूखंडावर असल्यामुळे पुनर्विकास करताना मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा सोडणं शक्य होत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त ७ मजली उंच इमारत बांधता येते. ७ मजल्याच्या वर आवश्यक दुसरा जिना आणि जास्तीची मोकळी जागा लहान भूखंड असल्यामुळे सोडता येत नाही आणि यामुळे अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या बाबीचा विचार करून मुंबई महापालिकेच्या धर्तीवर इमारतीची उंची ४५ मीटर म्हणजे १५ मजल्यांचं बांधकाम करून पुनर्वसन करणं शक्य होईल. मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत कलम ४७ अ नुसार इमारतीस आवश्यक असणा-या मोकळ्या जागांमध्ये कोणत्याही दोन बाजूस ६ मीटर मोकळी जागा सोडावी असे केल्यास इमारतीचा पुनर्विकास करणं आणि मंजूर चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करणं शक्य होणार आहे. ठाणे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत यासाठी बदल केल्यास पुनर्विकासातील अडथळा दूर होऊ शकतो. यासाठी महापौरांनी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करावा अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होऊन आगामी काळात ठाण्यातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading