दर महिन्याच्या अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तक देण्याच्या योजनेमुळं महापालिका शाळातील मुलांच्या पाठीवरील ओझं होणार कमी

महापालिका शाळेत जाणा-या मुलांच्या पाठीवरील ओझं आता कमी होणार आहे. ठाणे महापालिकेनं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महिनाभरात शिकवल्या जाणा-या ठराविक धड्यांचे पुस्तक दर महिना देण्याची अभिनव कल्पना आखली आहे. ठाणे महापालिकेच्या दीडशे प्राथमिक शाळांमध्ये ३७ हजाराहून अधिक विद्यार्थी असून यामध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या इयत्तेत असणारे २७ हजार विद्यार्थी आहेत. नवीन पुस्तकांची ही योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. सध्या पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी असलेलं पुस्तक विद्यार्थ्याला बाळगावं लागतं आणि विविध माध्यमांचे जवळपास ८ विषय विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळं पुस्तक आणि वह्यांचं मोठं ओझं विद्यार्थ्यांना होतं. मात्र पालिकेच्या योजनेनुसार दर महिन्यात शिकवल्या जाणा-या ठराविक १ ते ४ धड्यांचं स्वतंत्र पुस्तक तयार करून ते विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. यामुळं विद्यार्थ्यांच्या पाठीवरील विद्यार्थ्यांचं ओझं ब-याच अंशी कमी होईल असा पालिकेचा कयास आहे. विविध विषयांचे ठराविक धडे असलेलं हे पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना दिलं जाणार असून विद्यार्थ्याला हे पुस्तक आणि वही फक्त बाळगावी लागणार आहे. या योजनेसाठी ३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून या योजनेला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचं ओझं निदान महापालिका शाळांपुरतं तरी कमी होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading