Ncp political

शिक्षकांच्या अनुकंपा प्रकरणांना मुदतवाढ देण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी

शिक्षकांच्या अनुकंपा प्रकरणांना मुदतवाढ देण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. सामान्य प्रशासन विभागानं अनुकंपा प्रकरणांना २ वर्ष मुदतवाढ दिल्याच्या निर्णयाप्रमाणेच शालेय शिक्षण विभागानंही २०११ पासूनच्या प्रलंबित प्रकरणांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती निरंजन डावखरे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये २०११ पासून अनुकंपा तत्वावर एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळं खाजगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील अकाली निधन झालेल्या कर्मचा-यांची मुलं न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. सामान्य प्रशासन विभागानं फेब्रुवारी महिन्यात अनुकंपा नियुक्तीबाबत दोन वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं या कुटुंबांना दिलासा मिळणार होता. मात्र हा निर्णय शालेय शिक्षण विभागाला लागू नसल्याचं अधिका-यांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षण विभागातील अनुकंपा प्रकरणांनाही मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांनी अनुकंपा नियुक्तीबाबत स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. यामुळं शेकडो वारसांना दिलासा मिळू शकणार असल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *