२०२० मध्ये सुपरमून- ब्लू मून योगासह ४ गुरूपुष्यामृत योग, भरपूर विवाह मुहुर्त, अश्विन अधिक मास, सुट्ट्यांची चंगळ

बुधवारपासून सुरू होणा-या नूतन वर्षात म्हणजे २०२० मध्ये ४ गुरूपुष्यामृत योग, भरपूर विवाह मुहुर्त, अश्विन अधिक मास, सुट्ट्यांची चंगळ, सुपरमून आणि ब्लू मून योग आले आहेत. त्याचप्रमाणे लीप वर्ष असल्यानं कामाला एक दिवस जास्त मिळणार आहे. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. यावेळी लीप सेकंद पाळला जाणार नसल्यानं ३१ डिसेंबर रोजी ठीक रात्री १२ वाजता नूतन वर्ष २०२० सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे २०२० हे लीप वर्ष असल्यानं फेब्रुवारीत २९ दिवस असून हे वर्ष ३६६ दिवसांचं राहणार आहे. चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या नूतन वर्षात एकूण २४ सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १६ ऑगस्ट पारसी न्यू ईयर, ३० ऑगस्ट मोहरम, २५ ऑक्टोबर विजयादशमी या चारच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. तर इतर २० सुट्ट्यांपैकी १ ऑगस्ट बकरी ईद, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २२ ऑगस्ट गणेश चतुर्थी, १४ नोव्हेंबर दिवाळी लक्ष्मी पूजन या सुट्ट्या शनिवार, रविवारच्या सुट्टीला जोडून आल्या आहेत. ६ एप्रिल महावीर जयंती, २५ मे रमजान ईद, १६ नोव्हेंबर बलिप्रतिपदा, ३० नोव्हेंबर गुरूनानक जयंती या सुट्ट्या सोमवारी म्हणजे रविवारला जोडून आल्या आहेत. २०२० मध्ये २ सूर्यग्रहणं आणि ४ छायाकल्प चंद्रग्रहणं अशी ६ ग्रहणं होणार आहेत. यापैकी २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातील काही राज्यातून दिसणार आहे. १४ डिसेंबर रोजी होणारं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. १० जानेवारी आणि ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तर ५ जुलै आणि ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. ७ एप्रिल रोजी सुपरमूनचं दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लाख ५६ हजार ९०७ किलोमीटर इतका पृथ्वीच्या जवळ आल्यानं चंद्र १४ टक्के मोठा आणि जास्त तेजस्वी दिसणार आहे. २०२० मध्ये १ आणि ३१ ऑक्टोबरला म्हणजे एका महिन्यात २ पौर्णिमा आल्यामुळे ब्लू मूनचा योगही आला आहे. २०२० मध्ये २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर असे ४ गुरूपुष्य योग आल्यानं सोने खरेदी करणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२० मध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थी योग नसल्यानं गणेशभक्तांची मात्र निराशा होणार आहे. २०२० मध्ये १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात अधिक अश्विन मास येणार असल्यानं गणेशोत्सवाचा भाद्रपद महिना झाल्यानंतर नवरात्र घटस्थापना एक महिना उशिरानं होणार आहे. त्यामुळं २०२० मध्ये दसरा, दिवाळी सण हे उशिरानं येणार असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading