राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील हिरानंदानी फौंडेशन शाळेच्या संघाने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्य पदक पटकावले. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र,जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा २०१९-२० चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन परभणीच्या जिल्हा परिवाद अध्यक्षा उज्वला राठोड यांच्या हस्ते झाले.
ख्याती पांडे, प्रियांका गुप्ते आणि सायली प्रधान यांनी हिरानंदनी शाळेच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. तसेच वैयक्तिक गटात १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदीरच्या श्रावणी सावंतने ७ पैकी ६ सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. या कामगिरीच्या जोरावर श्रावणी सावंत बडोदा येथे ५ ते ९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची मानकरी ठरली आहे.