मेट्रो प्रकल्पासाठीची विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्याचा निर्णय

मेट्रो प्रकल्पासाठी माजिवडा जंक्शन ते गायमुख दरम्यान टाकण्यात येणारी विद्युतवाहिनी भूमिगत डक्ट बनवून टाकण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला. मेट्रो प्रकल्प उभारणीमध्ये येणा-या अडचणी सोडवण्यासाठी वस्तुस्थिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी मेट्रो तसंच महापालिका अधिका-यांना दिल्या. या बैठकीला मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अधिकारी, महावितरण तसंच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मेट्रोसाठी जी विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे ती विद्युत वाहिनी वरून न टाकता भूमिगत डक्टमधून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या डक्टला जोडूनच इतर सेवा वाहिन्यांसाठीही दुसरे डक्ट बनवण्यात येणार असून त्याचा वाढीव खर्च महापालिकेच्या वतीनं करण्यात येईल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामामध्ये वाहतूक कोंडी, विद्युत पोल, विद्युत वाहिन्या, वृक्षतोड, पाणी पुरवठा वाहिन्या किंवा इतर वाहिन्यांमुळे अडथळा येत असल्यास त्याचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. यावेळी महापालिका आयुक्तांनी दिवा आरओबी, खारेगाव आरओबी कामाचा आढावा घेतला. ही सर्व कामं एप्रिल ते मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच दिवा आरओबीमध्ये अडथळा ठरणारी अतिक्रमणं हटवण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्याचप्रमाणे कळवा उड्डाणपूलाच्या कामाचा आढावा घेऊन हे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading