collector

कशेळी-काल्हेर परिसरातील ७५ निवासी अनधिकृत इमारतींना सील

कशेळी-काल्हेर परिसरातील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या ७५ निवासी अनधिकृत इमारती काल सील करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनानं केलेल्या या कारवाई दरम्यान जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित होते. कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामावरही यावेळी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. नव्या शर्तीच्या जागेवर झालेल्या या बांधकामासाठी ग्रामपंचायत, पालिका किंवा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. या इमारतींपैकी काही इमारती पूर्ण झालेल्या निवासी इमारती असून काही अपूर्ण अवस्थेत आहेत. अपूर्ण इमारतींचा पंचनामा करून त्यांची कागदपत्रं रितसर तपासून त्या जमिनदोस्त केल्या जाणार आहेत. ज्या इमारती बांधून पूर्ण आहेत त्या शासनजमा केल्या जाणार आहेत. काल दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाई दरम्यान मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणाला आपलं प्राधान्य असून कशेळी, काल्हेर मधील कांदळवनाचा नाश करून बांधकामं सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या जमिनीवरही अतिक्रमणं झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *