general

डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या सांगता समारंभाचं आयोजन

विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा सांगता समारंभ येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला असून या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी ही माहिती दिली. या सांगता सोहळ्यामध्ये विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेतील आजी माजी मुख्याध्यापक आणि प्राचार्य तसंच डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या कुटुंबियांच्या डॉक्टरांच्या संदर्भातील आठवणी जागवणा-या मुलाखती माजी प्राचार्य अशोक चिटणीस घेणार आहेत. डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंडळाच्या विविध संस्थेत विचारवंत आणि समाजाला योगदान देणा-या मंडळींची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये १३ ते १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंडळानं आता लंडनमध्येही शाखा काढल्याची माहिती डॉ. विजय बेडेकर यांनी दिली. या सांगता सोहळ्यात डॉ. वा. ना. बेडेकर यांची व्यक्ती वैशिष्ट्ये चित्रीत करणारी १२५ पानांची स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार असून हे प्रकाशन डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते होणार आहे. तर डॉ. वा. ना. बेडेकर यांच्यावर तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबलचं प्रकाशन बेडेकर कुटुंबियांच्या हस्ते केलं जाणार आहे. डॉ. वा. ना. बेडेकर यांनी १९५७ मध्ये विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी आल्यावर संस्थेची पुनर्रचना करून शाळेच्या इमारती बांधल्या. १९६९ मध्ये त्यांनी ठाण्यात प्रथमच कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. १९७२ मध्ये टिएमसी विधी महाविद्यालयाची स्थापना, १९७३ मध्ये व्यवस्थापन शिक्षणासाठी व्यवस्थापन विभाग, १९७६ मध्ये ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाची शाळा, १९८३ मध्ये तंत्रनिकेतनाची निर्मिती, १९९६ मध्ये प्रगत अध्ययन केंद्र तर २००० मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाची स्थापना डॉ. वा. ना. बेडेकर यांनी केली. डॉ. वा. ना. बेडेकर यांनी सुरूवातीला स्वत:चे पैसे तसंच आईचे दागिने नातेवाईकांकडून तसंच अगदी घरोघरी फिरून संस्थेसाठी निधी उभा केला असे त्यांचे सहकारी अशोक चिटणीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *