ठाण्यात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

ठाण्यामध्ये विविध संस्थांतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं होतं. भारतीय संविधानानं कोणत्याही अनिष्ट रूढी, परंपरा वा अंधश्रध्दांना प्रोत्साहन न देता धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था
आणि दैनंदिन सार्वजनिक व्यवहारांना कायदेशीर मानणारे संविधान निर्माण केल्यामुळेच आज जगभरात भारताचं स्थान
वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान राष्ट्रपती डॉ.
राजेंद्रप्रसाद यांनी स्विकारले होते. तेव्हापासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ठाणे
महापालिकेतही संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या डीजी ठाणेच्या
माध्यमातून जवळपास २ लाख लोकापर्यंत संविधानाची उद्देशिका पोहचवून भारतीय संविधानासंदर्भात जनजागृती करण्यात
आली. यावेळी महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं. तसंच महापालिकेत संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
ठाणे न्यायालयातही संविधान दिन साजरा करण्यात आला. उच्च न्यायालयानं संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना
न्यायालयांना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे न्यायालयात संविधान दिनाविषयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी संविधानाची प्रस्तावना सर्वांना वाचून दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे संविधान अंगीकृत करावं असं आवाहनही
यावेळी करण्यात आलं. ठाणे न्यायालयातील अभिजित सावंत या विधीज्ञांनी संविधानातील तरतुदी आणि वैशिष्ट्य यावर
समयोचित भाषण केलं. या कार्यक्रमास मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन बोरकर यांच्यासह जिल्ह्यातील
न्यायाधीश, वकील वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. कोर्टनाका येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभाजवळ
संविधानाचं वाचन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी संविधानाला वंदन केलं. कोर्टनाका येथे अलिकडेच अशोकस्तंभ
उभारण्यात आला असून या अशोकस्तंभाच्या जवळ संविधानाची प्रतही ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading