मालमत्तेच्या वाटणीवरून झालेल्या वादात दुस-या पत्नीची गळा दाबून हत्या

मालमत्तेच्या वाटणीवरून नेहमी होणा-या वादाला कंटाळून पतीने दुस-या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वागळे इस्टेट, किसननगर ३ येथे राहणारे विशाल यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडील हयात असताना त्यांची आई शारदा यादव हिने सोमनाथ शुक्ला यांच्याशी गुपचूप दुसरा विवाह केला होता. विवाहानंतर शारदा हिने आपल्यासोबत पहिल्या पतीपासून जन्मलेल्या अमोल यादव याला बरोबर आणलं होतं. २००८ मध्ये पहिले पती संपत यादव यांचं निधन झालं. शारदा आणि सोमनाथ यांनी इंदिरानगर रूपादेवीपाडा येथे २ खोल्या बांधून एक खोली शारदाच्या पहिल्या पतीचा मुलगा अमोल यादव याच्या नावावर तर दुसरी खोली सोमनाथ यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अशोक यांच्या नावावर करण्याचा तगादा पतीकडे लावला होता. मात्र सोमनाथ यांना या दोन्ही खोल्या अशोक शुक्लाच्या नावावर करायच्या होत्या. शारदा हिला अधूनमधून फिट येत असे. या भांडणामुळे सोमनाथने शारदाचे औषधोपचारही बंद केले होते. ८ नोव्हेंबर रोजी खोल्या नावावर करण्यावरून शारदा आणि सोमनाथमध्ये वाद झाला. त्यावेळी सोमनाथने शारदाचा गळा आवळून खून करून आजारपणात नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवलं. जिल्हा शासकीय रूग्णालयात झालेल्या शव विच्छेदनात शारदाची गळा आवळून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं विशाल यादवनं सोमनाथ यांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता सोमनाथ शुक्ला यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading