politicalshivsena

विमा कंपन्यांनी अटी-शर्ती न ठेवता शेतक-यांना मदत करावी – एकनाथ शिंदे

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी शासन भक्कम उभे आहे. विमा कंपन्यांनी ताबडतोब अटी-शर्ती न ठेवता शेतक-यांना मदत करावी अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेऊन काल जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्र्यांनी केली त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या ग्रामीण तालुक्यात ५० हजार हेक्टर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी अवकाळी पावसामुळे ४१ हजार हेक्टर भातपीकाचे नुकसान झालं आहे. शेतक-यांना सावरण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा यासारख्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. तसंच दुष्काळी परिस्थितीत ज्याप्रमाणे सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात. रब्बी पीक काढण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून साफसफाई करून बी-बियाणांचा पुरवठा करावा म्हणजे शेतक-यांना दिलासा मिळेल असं ते म्हणाले. विमा कंपन्यांनी शासनाच्या अधिका-यांचे पंचनामे किंवा शेतक-यांनी पाठवलेली छायाचित्रं ग्राह्य धरावी, बँकांनी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये अशा सूचनाही दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या नुकसानीबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल असं सांगितलं.

Comment here