जिल्ह्यामध्ये एकीकडे मतदानाचा टक्का घटला असताना बंदोबस्तात व्यस्त असूनही ९२ टक्के पोलीसांनी बजावला मतदानाचा हक्क

एकीकडे मतदान कमी झाल्याची चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे बंदोबस्तात व्यस्त असतानाही पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात ९ हजार २१२ पोलीस असून त्यापैकी ८ हजार ५६३ पोलीसांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोलीसांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून दिल्यामुळे बंदोबस्तातही पोलीसांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला. टपाली मतदानाची प्रक्रिया ही किचकट असते. या संदर्भात पोलीस आयुक्तालयात ही प्रक्रिया माहिती होण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे प्रशिक्षणही देण्यात आलं. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशा पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाणी आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व युनिटमध्ये टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टपाली मतदान कक्षही स्थापन करण्यात आला होता. या कक्षाकडे पाठपुरावा करण्यासाठी मुख्यालयातील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांच्या पातळीवर टपाली मतदान कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. पोलीसांना मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक या माहितीची पडताळणी करून घेण्यासाठी अर्जही पाठवण्यात आले होते. मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचा-यांनी टपाली मतपत्रिका मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे १२ क्रमांकाचा अर्जही भरून पाठवला होता. टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर ती भरून पुन्हा निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पाठवण्यासाठी फारच थोडा वेळ असल्यानं पाठपुरावाही करण्यात आला. पोलीस आयुक्तांमुळे बंदोबस्तामध्ये पोलीस व्यस्त असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच टपाली मतदानाद्वारे मतदान करून पोलीसांनी मतदान न करणा-यांसमोर एक आदर्श निर्माण केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading