govt

कोपरी पूलाच्या कामास या महिना अखेरीस सुरूवात तर ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाचाही लवकरच प्रारंभ

कोपरी येथील अरूंद ब्रीजमुळे होणा-या वाहतूक कोंडीनं हैराण झालेल्या वाहन चालकांना आता लवकरच दिलासा मिळणार असून या पूलाच्या रूंदीकरणाच्या कामाला या महिना अखेरीस सुरूवात होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे मेट्रोची निविदा प्रक्रियाही महिनाभरात पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. पालकमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पूर्व द्रूतगती महामार्ग हा ८ पदरी असला तरी कोपरी पूल अरूंद असल्यामुळं इथे गेली काही वर्ष वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार झाल्यापासून सातत्यानं याचा पाठपुरावा करत आहेत. आमदार संजय केळकर यांनी सर्वप्रथम यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार संजीव नाईक यांनीही या पूलासंदर्भात वारंवार मागण्या केल्या होत्या. सुरूवातीला हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रूंद केला जाणार होता. मात्र त्यात दिरंगाई झाल्यानं याचा खर्च वाढला. त्यानंतर या पूलाचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं करण्याची जबाबदारी स्विकारली. जुन्या पूलाच्या जागी नविन ८ पदरी पूल बांधला जाणार असून त्यामुळं वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होऊन महिना अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असं प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी या बैठकीत सांगितलं. कोपरीतील पूलाप्रमाणेच वडाळा, घाटकोपर, कासारवडवली या ठाणे मेट्रोच्या कामालाही सुरूवात होणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार असल्याचं प्रवीण दराडे यांनी या बैठकीत सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *