cultural

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यामुळं स्वातंत्र्य चळवळीसाठी जनजागृती प्रचार करण्याकरिता व्यासपीठ – अशोकराव गोडसे

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यामुळं स्वातंत्र्य चळवळीसाठी जनजागृती प्रचार करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध झाले. पुण्यातील टिळक वाड्यात दगडूशेठ हलवाई, भाऊसाहेब रंगारी यासारख्या ५ प्रतिष्ठीत लोकांची बैठक झाली. त्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार मांडण्यात आला. तो एकमतानं मंजूर झाल्यावर शहरात ५ मानाचे गणपती सुरू झाले. तेव्हापासून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ झाला असे दगडूशेठ हलवाई संस्थेचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी सांगितलं. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत माधुरी ताम्हाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी आठवणी सांगताना ते बोलत होते. त्यावेळी ब्रिटीश सत्ता असल्यामुळं उत्सवास परवानगी नव्हती. तरी ७ दिवस सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मुभा मिळाली आणि त्यातूनच गणेशोत्सव सुरू झाला असं गोडसे यांनी सांगितलं. सुरूवातीला दगडूशेठ हलवाई यांनी पदरमोड करून तीन वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव केला. उत्सवासाठी समाजानं दिलेले पैसेरूपी दान याचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे असं मंडळाच्या भाऊसाहेब यांनी ठरवले. त्यानुसार समाजातील हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा भार ट्रस्ट उचलू लागले. याचाच भाग म्हणून १९६६ मध्ये ५ हजार विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. त्यातून सुवर्ण तरूण मित्रमंडळाची स्थापना झाली. आज ५ हजार विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. विद्यार्थी दत्तक घेताना त्यांनी देखील मोठे झाल्यावर १० विद्यार्थी दत्तक घेऊन शिकवायचे अशी अट ठेवली जाते असं गोडसे यांनी सांगितलं. दगडूशेठ हलवाई मंदिराच्या जवळ रेडलाईट एरिया आहे तिथे वेश्या व्यवसाय करणारी, देवदासी मुले, देहविक्रय करणा-या महिलांची मुलं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना ट्रस्टच्या वतीनं बाल संगोपन केंद्रात शिक्षित केले जाते. तसंच वृध्दांना उतारवयात आधार देण्यासाठी पिताश्री नावाचा वृध्दाश्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं हे वृध्द बाल संगोपन केंद्रातील मुलांचा सांभाळ करतात आणि त्यांना शिकवतात. त्यांच्यामुळे मुलांना आजी-आजोबा मिळतात आणि वृध्दांना या बालकांच्या रूपाने आनंद मिळतो. त्यांच्या आयुष्यातील नैराश्य नाहिसे होते असं गोडसे यांनी सांगितलं. सामाजिक कार्य करताना आम्ही सहसा अपवाद सोडला तर वैयक्तीक मदत करत नसल्याचंही अशोकराव गोडसे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *