वीजेचा धक्का लागून कळव्यात दोघांचा मृत्यू

वीज भरणा न केल्यानं महावितरणनं वीज खंडीत केल्यानंतर चोरून वीज घेऊन घरातील पंखा सुरू करण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून ११ वर्षीय मुलीसह ३० वर्षाच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कळव्यातील सम्राट अशोकनगरमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन राठोड याने वारंवार सूचना करूनही वीजेचं बील न भरल्यानं त्याच्या घराची वीज खंडीत करण्यात आली होती. पत्र्याच्या खोलीत राहणा-या अर्जुनला उकाडा जाणवत असल्यानं त्यानं चोरून पंख्याला वीज जोडणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडी रॉडमध्ये विद्युत प्रवाह आल्यानं त्याचा मृत्यू झाला. लोखंडाच्या माध्यमातून अर्जुनच्या खिडकीच्या ग्रीलसह बाजूच्या घराच्या लोखंडी जिन्यापर्यंत हा वीज प्रवाह पोहचला. रात्री बाहेर आलेल्या ११ वर्षीय गीता अडसुळे या मुलीला या प्रवाहाचा धक्का लागल्यानं तिचाही मृत्यू झाला. हे दोघे सुरूवातीला बेशुध्द पडले होते. त्यामुळं त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अर्जुन राठोडच्या वडीलांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेनं सम्राट अशोकनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading