Rain

सोसाट्याच्या वा-यामुळे झाडं पडून दोघांचा मृत्यू

काल रात्री सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या चमचमाटासह अवचित आलेल्या पावसानं ठाणेकरांची तारांबळ उडवली. काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास सोसाट्याच्या वा-यासह जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्धा तासात २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काल दसरा होता त्यामुळं अनेक ठिकाणी देवी विसर्जन सुरू होतं. हे विसर्जन सुरू असतानाच विजेच्या चमचमाटासह ढगांच्या कडकडाटात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. जोरदार वा-यामुळे सुरूवातीला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा जमा झाला होता. जोरदार वा-यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान झालं तर ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एक भला मोठा वृक्ष पडल्यानं दोघांना आपला जीव गमवावा लागला. सुसाट वाहणा-या वा-यानं झाड हलत होतं. अचानक जोरात आवाज झाला आणि झाड मधोमध खाली कोसळलं. आडोशाला उभ्या असणा-या अमन शेख या प्रवाशाच्या डोक्यावरच झाड पडल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. तर रूपचंद जयस्वाल यामध्ये गंभीर जखमी झाला होता. पण नंतर त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला. ५० वर्ष जुनं झाड अचानक मध्ये तुटल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण हे झाड जमिनीपासून ८ ते १० फूट उंचावर तुटलं असून तुटलेल्या झाडाच्या खोडामध्ये थोडंसं कापल्याचं दिसत आहे.

Comment here