दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

विजयादशमी म्हणजे दसरा आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. दस-याच्या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. घटस्थापना ते विजयादशमी या १० दिवसात सर्वत्र मंगलमय आणि पवित्र अशी वातावरण निर्मिती झालेली असते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असल्यानं महाराष्ट्रात दस-याला एक वेगळंच महत्व आहे. रामाचा विजयोत्सव आणि देवीनं केलेला महिषासुराचा वध या निमित्तानं दसरा सण साजरा करण्याची प्रथा आहे. पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र अश्विन शुक्ल दशमी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी खाली उतरवली आणि त्याचं पूजन केलं. त्यामुळं दस-याच्या दिवशी शारदेबरोबरच शस्त्रास्त्रांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरोघरी शस्त्रांबरोबरच पाठ्यपुस्तकांचीही पूजा केली जाते. सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या पध्दती आणि परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुहुर्त पहावा लागत नसल्यामुळं बहुतेक ठिकाणी नविन कामाची सुरूवात या दिवशी केली जाते. सरस्वती पूजन करून देवीची पूजा केली जाते. ज्यांच्या घरी घट बसले आहेत त्यांच्या घरी घटांची पूजा करून संध्याकाळी अक्षता वाहून घट आणि घटमाळांचं विसर्जन केलं जातं. अनेक कार्यालयांमध्येही विविध साहित्याची पूजा करण्यात येते. तर संध्याकाळी नविन कपडे घालून एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देऊन दसरा साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading