ट्रक चालकांना मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्य लुटणा-या दोघा व्यक्तींना अटक

दुचाकीवरून येऊन ट्रक चालकांना मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्य लुटणा-या दोघा व्यक्तींना कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसात राज्याबाहेरून येणा-या ट्रक आणि ट्रेलर मालक यांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. त्यामुळं अशा चोरांना आळा घालण्यासाठी कासारवडवली पोलीसांनी पाळत ठेवली होती. त्याप्रमाणे काल आनंदनगर, गायमुख, नागला बंदर परिसरात गस्त घातली जात असताना गायमुख चौपाटी परिसरात एक काळ्या रंगाची दुचाकी आली त्यावेळी पोलीसांनी दुचाकीवरील व्यक्तींना हटकलं असता ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आलं. शंकर खरात आणि आकाश वीर अशी त्यांची नावं असून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे दोघे परराज्यातून आलेल्या ट्रक, ट्रेलर अशा वाहनांसमोर जाणीवपूर्वक ओव्हरटेक करून दुचाकी नेऊन त्यांना थांबायला भाग पाडत असत आणि धक्का लागल्यानं खाली पडून नुकसान झाल्याची बतावणी करून वाहन चालकांना लुटण्याची त्यांची कार्यपध्दती होती. या दोघांनाही कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading