BJPpolitical

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मुंबईप्रमाणेच ठाण्यातही ३०० चौरस फूटाचं घर

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडपट्टी धारकांनाही ३०० चौरस फूटाचं घर देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. आमदार संजय केळकर यांनी विधी मंडळात या प्रकरणी चर्चा घडवून आणली होती आणि मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळं ठाण्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार विविध प्रकारच्या जमिनींवर २१० झोपडपट्ट्या वसल्या असून साडेनऊ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबईतील झोपडपट्टी धारकांना ३०० चौरस फूटाचं घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ठाण्यातील झोपडपट्टी धारकांना मात्र २५९ चौरस फूटाचंच घर दिलं जात होतं. यामुळे झोपडपट्टी धारकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मुंबईत ४ तर ठाण्यात ३ चटई क्षेत्र दिलं जातं. मुंबईमध्ये ५१ टक्के तर ठाण्यात ७० टक्के संमती आवश्यक आहे. अलिकडेच झोपडपट्टी रहिवासी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या संदर्भात एक निवेदनही दिलं होतं. याप्रकरणी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केळकर यांनी बाजू मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडी धारकांना ३०० चौरस फूट घर देण्याची मागणी मान्य केली. अन्य अटी नियमही मुंबई प्रमाणेच ठेवले जाणार आहेत.

Comment here