प्लास्टीक बंदी विरोधात केलेल्या कारवाईत ८८८ किलो प्लास्टीक जप्त

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 888 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 1 लाख 35 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. शासनाकडून प्लास्टीक आणि थर्माकोल अविघटनशील वस्तुचे उत्पादन , वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक याबाबत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरिता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधीत प्लास्टीक आणि थर्माकोल वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सन 2018-19 या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण 15 हजार 548 किलो प्लस्टिक आणि थर्माकोल वाहनाद्वारे संकलन करण्यात आले आहे. तर 5 हजार 49 किलो प्लस्टिक आणि थर्माकोल आस्थापना धारकांकडून जप्त करण्यात आले असून साडेनऊ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून 800 किलो प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले असून 1 लाख 35 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टीकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांद्वारे तसेच विविध सार्वजनिक मंडळाद्वारे सजावटीचे सादरीकरण करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या प्लास्टीक आणि थर्माकोल बंदीची अंमलबजावणी शहरात होण्याकरिता नागरिक, सार्वजनिक मंडळे तसेच व्यापाऱ्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करुन सजावटीकरिता जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तुचा वापर करावा. प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading