political shivsena

डोंबिवलीत सहा महिन्यांत गरजू रुग्णांना अल्प दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार

गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून डॉ. शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यास कल्याण–डोंबिवली महानगरच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

त्यामुळे जागा उपलब्ध झाल्यानंतर सहा महिन्यांत गरजू रुग्णांना अल्प दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे.कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय येथे डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. खासगी रुग्णालयांमधील डायलिसिसचे दर परवडणारे नसतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट होत असल्याची बाब लक्षात घेऊन खा. शिंदे यांनी अद्ययावत डायलिसिस सेंटरसाठी खासदार निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी गेले दीड–दोन वर्षे पाठपुरावाही सुरू होता.अखेरीस काल कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डोंबिवली पूर्वतील पी.पी. चेंबर्स येथील २५०० ते ३००० चौरस फूट जागा डायलिसिस सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *