भिवंडी येथे एक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

भिवंडी येथे एक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली. भिवंडीतील शांतीनगर परिसरात एक चार मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या ४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं तर दोघांचा मृत्यू झाला. इमारत कोसळल्याचं वृत्त समजताच एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या इमारतीत २२ कुटुंबं राहत होती. या इमारतीत राहत असणा-या कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आलं होतं. मात्र काही रहिवासी प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून पुन्हा इमारतीत रहायला गेले आणि ही दुर्घटना घडली. यामध्ये अब्दुल सय्यद, जावेद शेख आणि निजाम सिद्दिकी हे तिघेजण जखमी झाले असून त्यांना इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर सिराज अन्सारी आणि महम्मद शेख या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेदरम्यान मदतकार्य सुरू असताना नरेंद्र बवाणे आणि देवीदास वाघ हे अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading