ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सावळा गोंधळ – प्रथम आलेला स्पर्धक ठरला अपात्र

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा सावळा गोंधळ पहायला मिळाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या पिंटू यादवला अपात्र घोषित करण्यात आलं. मात्र हाच पिंटू यादव २०१७च्या मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा आला होता. तेव्हा पात्र ठरलेला पिंटू यंदाच्या स्पर्धेत अपात्र कसा या प्रश्नाला मात्र उत्तर मिळू शकलं नाही. ३०व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन काल ठाण्यात करण्यात आलं होतं. पालकमंत्र्यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यंदा स्पर्धा वेगळ्याच कारणानं गाजली. या स्पर्धेतील २१ किलोमीटर या मुख्य स्पर्धेत पिंटू यादव प्रथम आला होता. पण त्याला अपात्र ठरवण्यात आलं. सुरूवातीला मॅरेथॉन चीप मॅच होत नसल्याचं कारण देण्यात आलं तर नंतर त्याच्याकडे महाराष्ट्रातील निवासाचा पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं या स्पर्धेत दुस-या आलेल्या करणसिंग घिसाराम याला या स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह २३ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी जेमतेम काही हजारच स्पर्धक धावल्याचं पहायला मिळालं. स्पर्धेच्या व्यासपीठासमोरच साचलेल्या पाण्यामुळे स्पर्धकांना त्याचा फटका बसला. २१ किलोमीटर महिलांच्या गटात आरती पाटीलनं प्रथम तर वर्षा गोडबोलेनं द्वितीय क्रमांक पटकावला. पुरूषांच्या गटात प्रल्हाद धनवंत तर महिला गटात अक्षया जडियारनं तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील दोन्ही विजेत्यांना ७५ हजारांचं पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. ज्येष्ठ नागरिक पुरूषांच्या गटात हरिश्चंद्र पाटील प्रथम, किसन अरबुज द्वितीय तर चंद्रकांत गायकवाड यांना तृतीय क्रमांक मिळाला. महिलांच्या गटात पद्मजा चव्हाण यांना प्रथम, नीना दोशी यांना द्वितीय तर रेखा ताम्हणेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. २ किलोमीटरच्या रन फॉर स्मार्ट ठाणे या स्पर्धेत अनिल यादव यांना प्रथम, मनोज नवोर यांना द्वितीय तर दत्ता देवकर यांना तृतीय क्रमांक मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading