ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरपोच ही अभिनव योजना

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयानं फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरपोच ही अभिनव योजना सुरू केली आहे. सभासदानं फोनवरून पुस्तकाची मागणी करायची आणि ते पुस्तक त्याला ४८ तासात घरपोच पोहचवलं जाईल अशी ही योजना आहे. या योजनेचा शुभारंभ ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते झाला. वाचकांच्या घरी पुस्तक स्वत: जाणार असेल तर वाचकांची मोठी गरज पूर्ण होणार आहे. वाचक आणि सभासद संख्या वाढवण्यासाठी अशा कल्पनांची गरज आहे असं समेळ यांनी सांगितलं. आपलं अश्वत्थामा हे पुस्तक एका तरूण मुलानं वाचलं आणि त्याचं दारूचं व्यसन सुटलं असा अनुभव पुस्तक वाचनाचा किती खोल परिणाम होतो हे सांगताना अशोक समेळ यांनी सांगितला. पुस्तकांप्रमाणेच कदाचित वाचकांना पुस्तकं ऐकता येतील अशी सोय आपल्याला करावी लागेल. लेखकाच्या आवाजात पुस्तकं ऐकायला आवडेल अशी योजनाही आपल्याला राबवावी लागेल ही भावी काळाची गरज आपण ओळखली पाहिजे असं विश्वस्त दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. आता बंद कपाटातील पुस्तकं मुक्त झाली असून त्यांना आता वाचक भेटणार आहे. पुस्तकांची यादी लवकरच संकेतस्थळावर टाकली जाणार असून यासाठी एक ॲपही लवकरच तयार होत असून यामुळं सभासदांना घरबसल्या पुस्तकं निवडता येतील असं संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितलं. फोन अ बुक साठी ९७६८२ ५७५७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading