ठाणे महापालिकेनं बांधलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

नागरिकांना मुलभूत सेवा देण्याबरोबरच पर्यटनाचे नवनविन प्रकल्प उभारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा विचार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या विद्यमानं गायमुख येथे निर्माण करण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचं लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलताना त्यांनी हा विचार व्यक्त केला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये बांधण्यात येणा-या आगरी-कोळी भवन, गायमुख घाटाचं भूमीपूजन तसंच टिकुजीनी वाडी येथील वनस्थळी उद्यानाचं लोकार्पणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. पर्यटनाच्या दृष्टीनं गायमुख चौपाटी प्रकल्प आदर्श ठरेल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा असणा-या आणि भविष्यात ठाण्याचा मरीन ड्राईव्ह म्हणून ओळखला जाणारा गायमुख चौपाटी विकास प्रकल्प आहे. खाडी किना-याचे सुशोभिकरण करून नागरिकांना मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यटनास चालना देण्याकरिता चौपाटी विकास हा विशेष प्रकल्प ठाणे महापालिकेकडून राबवण्यात आला आहे. गायमुख येथे दोन टप्प्यात प्रॉमिनॉड उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १९० मीटरचे प्रॉमिनॉड उभारण्यात आले आहे. तर दुस-या टप्प्यात ३०० मीटरचे प्रॉमिनॉड उभारण्यात येणार आहेत. टिकुजिनीवाडी येथील वनाचे योग्य नियोजन करून हे वनस्थळी उद्यान तयार करण्यात आलं आहे. यामध्ये अस्तित्वातील जंगली झाडांचं संवर्धन करण्यात आलं आहे. तसंच या उद्यानामध्ये ट्री हाऊस उभारण्यात आलं असून मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी येताना आदित्य ठाकरे यांना घोडबंदर रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading