भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

भारताचा ७३वा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावर कोणतंच सावट नव्हतं. ना कोणती साथ होती ना कोणती दहशतवाद्यांची धमकी होती. फक्त कोल्हापूर सांगलीमधील पूरग्रस्तांच्या दु:खाची किनार या सोहळ्याला होती. मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर नियोजन भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा विशेष आहे. 370 आणि 35 ए कलम रद्द झाल्याने देशांत आनंदाचे वातावरण असून काश्मिरी बांधवाना मुळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. पूर परिस्थितीत महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल तसेच जिल्ह्यात महापुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हा प्रशासन, मदत पथके, पोलीस दल, सेवाभावी सामाजिक संस्था, स्थानिक नागरिकांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून या जिल्ह्याचा गतिमान विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी 2018 मध्ये केलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते धातूचे बोधचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.वन विभाग आणि सामाजिक वनीकरण ठाणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी महसुल विभाग ठाणे अंतर्गत व्यक्ती, शैक्षणिक संस्थांना प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच 2017-18 आणि 2018-19 चे गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत क्रीडा कार्यकर्ते, संघटक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading