BJPpolitical

राज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

राज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी ही स्पर्धा नवनवीन वाद निर्माण करते. यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्डे असल्यानं महापौर पाहणी दौरा अर्धवट सोडून गेल्या होत्या. त्याचप्रमाणे मॅरेथॉनसाठी प्रायोजकांकडून मिळणा-या रक्कमेवरून आणि स्पर्धेकरता भर रस्त्यात उभारण्यात येणा-या व्यासपीठामुळे मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोव-यात सापडली आहे. हे सर्व वाद टाळण्यासाठी आणि मॅरेथॉन स्पर्धेवर केला जाणारा खर्च पाहता ही रक्कम सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी द्यावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून होणारी लाखोंची उधळपट्टी टाळून हा निधी पूरग्रस्तांच्या कल्याणासाठी वापरल्यास महापौरांचा संवेदनशीलपणा दिसून येईल. अन्यथा अशा परिस्थितीत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणं म्हणजे असंवेदनशीलतेचं प्रतिक मानलं जाईल असं नारायण पवार यांनी म्हटलं आहे.

Comment here