अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

वागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पाठबळ देणा-या संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करून तिथे अनधिकृतपणे चालणा-या गुटखा विक्रीस आळा घालावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे केली आहे. ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी आणि इतर काही भागात गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असून काही अधिका-यांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांना देऊनही त्यांनी उपाययोजनेबाबत काही न कळवणं ही गंभीर बाब असल्याचंही केळकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. पोलीसांनी जप्त केलेला गुटखा ज्या गोदामात ठेवला जातो त्या गुटख्याला मध्यरात्री काळोखात पाय फुटून तो बाजारात विक्रीसाठी कसा जातो या लबाडीची चौकशी करावी त्याचप्रमाणे गुटख्याची विक्री करणा-या आरोपीला पकडल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी कोण कोण मध्यस्थी करतात यावर नजर ठेवली म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा अनुभव येईल असं केळकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे. याप्रकरणी अधिका-यांवर कडक कारवाई करून दलालांचा बंदोबस्त करावा. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं तर थातुरमातुर कारवाया बंद होतील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे. जयकुमार रावळ यांनी संबंधितांवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading