उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं ठाण्यातही मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नवी मुंबई मार्गावर उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं प्रवाशांचे हाल झाले. काल सकाळीही ठाणे-नवी मुंबई मार्ग काही काळ विस्कळीत झाला होता. संध्याकाळी ऐरोलीच्या दरम्यान उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरले. त्यामुळं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्यानं ऐरोली, रबाळे अशा विविध स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेक प्रवाशांनी नवी मुंबईतून ठाण्यात येणा-या खासगी बसगाड्या पकडून ठाणे गाठण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचं काम पूर्ण झालं नव्हतं. ठाणे, वाशी, पनवेल उपनगरीय सेवा बंद पडल्याचा फटका ठाणे रेल्वे स्थानक परिसरालाही बसला होता. घरी परतणा-या तसंच रात्रपाळीसाठी जाणा-यांची गर्दी सिडको बस स्टॉपवर वाढली. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रिक्षा तसंच बसेस नवी मुंबईला जात असतात. त्यामुळं सिडको बस स्टॉप पासून कळव्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading