मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवण्याचे महापौरांचे आदेश

मॅरेथॉन मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ३०वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या १८ ऑगस्टला होत आहे. यंदाच्या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे महिलांसाठी देखील २१ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून किन्नर समाजापर्यंत अनेकजण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये २० हजार धावपटू सहभागी होतील असं महापौरांनी सांगितलं. या मॅरेथॉनच्या मार्गाची महापौरांनी काल पाहणी केली आणि पाहणी दरम्यान रस्त्यावरील खड्डे पाहून हे खड्डे तातडीनं बुजवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. विविध ११ गटात होणा-या या स्पर्धेत पहिल्या ५ गटातील स्पर्धा राज्यस्तरावर होणार आहेत. २१ किलोमीटर स्पर्धेत पुरूषांच्या गटासाठी पहिल्या क्रमांकास ७५ हजार, दुस-या क्रमांकास ४५ हजार, तिस-या क्रमांकास ३० हजार, चौथ्या क्रमांकास १५ हजारांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. महिलांच्या १० किलोमीटरच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकास २५ हजार, दुस-या क्रमांकास २० हजार, तिस-या क्रमांकास १५ हजार, चौथ्या क्रमांकास १० हजारांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या २१ किलोमीटरच्या महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या क्रमांकास ७५ हजार, दुस-या क्रमांकास ४५ हजार, तिस-या क्रमांकास ३० हजार, चौथ्या क्रमांकास १५ हजार तर पाचव्या क्रमांकास १० हजारांचं पारितोषिक दिलं जाईल असं महापौरांनी सांगितलं. जिल्ह्यासाठी असलेल्या मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षावरील महिला आणि पुरूषांचा गट वेगळा असणार आहे. रन फॉर स्मार्ट ठाणे या २ किलोमीटरच्या स्पर्धेत महापलिका कर्मचारी तसंच पत्रकारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. यावर्षी ज्युपिटर हॉस्पिटलमधील अर्धांगवायूतून पूर्ण बरे झालेले रूग्ण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षा रक्षक, शेकडो स्वयंसेवक, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मेहनत घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading