चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पावसानं गेले दोन दिवस उघडीप घेतली असली तरी गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जून अखेरीला अगदी तळ गाठलेल्या धरणांमध्ये आता जवळपास ६० टक्के पाणी साठा झाला आहे. मात्र गेल्यावर्षीच्या याच काळातील तुलनेत हा साठा २० ते २२ टक्क्यानं कमीच आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या भातसा आणि बारवी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. भातसा धरणाच्या परिसरात १ जूनपासून आजपर्यंत जवळपास १४५७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस अधिक असला तरी धरणातील पाणीसाठा मात्र कमी आहे. भातसा धरणामध्ये सध्या ५५१ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. तो गेल्यावर्षी ६०३ दशलक्ष घनमीटर होता. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त होऊनही पाण्याचा साठा ५२ दशलक्ष घनमीटरनं कमी आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही १ जूनपासून आत्तापर्यंत ११३० मिलीमीटर पाऊस झाला. गेल्यावर्षी याच काळात १४७७ मिलीमीटर पाऊस झाला होता. भातसा धरणामध्ये सध्या १३५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी तो १९२ दशलक्ष घनमीटर होता. म्हणजे ५७ दशलक्ष घनमीटरनं पाण्याचा साठा कमी आहे. भातसा धरणामध्ये आजघडीला ५९ टक्के पाणीसाठा आहे तर गेल्यावर्षी तो ६४ टक्के होता. बारवी धरणामध्ये आजघडीला ५८ टक्के पाणीसाठा असून गेल्यावर्षी तो याच कालावधीत ८२ टक्के होता. पावसानं सध्या उघडीप घेतली असली तरी पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणखी काही दिवस पावसाची गरज आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading