नौपाडा पोलीसांनी अवघ्या चार तासात केला हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध

ठाण्यातील नौपाडा पोलीसांनी हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध अवघ्या चार तासात घेऊन तिला तिच्या आजोबांच्या पुन्हा सुखरूप ताब्यात दिलं. उस्मान शेख हे तलावपाळी येथील मंजू रेड्डी यांच्या चहाच्या टपरीवर काम करतात. त्यांच्या मुलीला क्षयरोग असल्यामुळं त्यांच्या नातीस सोबत घेऊन ते तलावपाळी भागात राहतात आणि काम करतानाही आपल्या सोबतच ठेवतात. सोमवारी ते नौपाडा पोलीस स्टेशनजवळ काम करत असताना त्यांची नात तिथे खेळत होती. चहाची ऑर्डर मिळाल्यामुळं ते चहा देण्यासाठी म्हणून गेले. त्याच दरम्यान त्यांची नात तिथून हरवली. या घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी एक पथक तयार करून त्यांना शेख यांची नात गौरीचा शोध घेण्याचे आदेश दिले. नौपाडा पोलीसांच्या पथकानं शेख यांना सोबत घेऊन या लहान मुलीचा शोध सुरू केला. या मुलीबाबत जसजशी माहिती मिळत गेली तसतशी पोलीसांची पथकं विविध ठिकाणची सीसीटीव्ही फूटेज तपासत लोकांकडे विचारपूस करत होती. अखेर ब-याच तपासानंतर जांभळीनाका येथील भाजी मंडईमध्ये गौरी या पथकाला मिळाली. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर ती खेळता खेळता रस्ता विसरल्यानं भाजी मंडईमध्येच झोपून राहिली अशी माहिती तिनेच आजोबा आणि महिला पोलीसांना दिली. नात परत मिळाल्यामुळं आजोबांच्या चेह-यावरही आनंद दिसत होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading